हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाईसह सहा जणांना अटक
Crime branch news : पुणे: जमीन नावावर करुन न दिल्याने एका शेतकऱ्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याच्यासह सहा जणांना पौड पोलिसांनी अटक केली. मुळशीतील दारवली गावात ही घटना घडली. याबाबत प्रदीप शिवाजी बलकवडे (वय ३५, रा. दारवली, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी धनंजय देसाई याच्यासह सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी दिली.
कोंढव्यात दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगाराविरोधात एमपीडीए ची कारवाई .
याप्रकरणी देसाई याच्यासह रमेश जायभाय, श्याम सावंत, रोहित यांच्यासह १० ते १५ साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पौड परिसरातील दारवली गावात बलकवडे कुटुंबीय राहायला आहे. बलकवडे गावातील सचिन ठोंबरे यांच्या घरात बसले होते. त्यावेळी देसाईचे साथीदार घरात शिरले. देसाई यांच्या नावावर जमीन का करुन दिली नाही, अशी विचारणा करुन त्यांना धमकावले. जमीन नावावर करुन न दिल्यास तुझ्यासह कुटुंबीयांना जीवे मारू, अशी धमकी दिली. बलकवडे यांना श्याम सावंतने पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण केली. आरोपींकडे काठ्या, गज होते, असे बलकवडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. आरोपींनी गावातील नागरिकांनी धमकावले. पोलीस निरीक्षक यादव तपास करत आहेत.
धनंजय देसाई याने बारा वर्षांपूर्वी पौड भागात अतिक्रमण करुन घर बांधले. देसाई हिंदू राष्ट्र सेना चालवित असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्याच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. मुळशी तालुक्यात देसाई आणि साथीदारांनी दहशत माजविली आहे. गोशाळेच्या नावाखाली पाळीव जनावरे शेतात सोडून दिली जातात. देसाईला जाब विचारल्यास तो ग्रामस्थांना धमकावतो. संघटनेच्या नावाखाली तो समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. त्याने दारवलीलीत हुलावळेवाडीतील तरुणांना मारहाण केली होती, असे समस्त ग्रामस्थ दारवलीकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.दरम्यान, देसाईविरुद्ध कारवाई करण्यासाठी दारवली ग्रामस्थांकडून बुधवारी पौड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला.